राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यातील निकाल समोर आले आहेत. ‘ब’ वर्ग सभासद प्रतिनिधी या प्रवर्गातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विजयी झाले आहेत. ही निवडणूक स्थानिक साखर कारखान्यापुरती मर्यादित राहिलेली नसून, ती पवार कुटुंबाच्या राजकीय वर्चस्वाचे प्रतीक ठरली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे आणि सामान्य जनतेचेही विशेष लक्ष लागले होते. या निवडणुकीमध्ये सुरवातीपासून अजित पवारांनी आघाडी घेतली आहे. ही आघाडी त्यांनी अद्यापही कायम ठेवलेली आहे.
माळेगाव आतापर्यंत कोणता निकाल आला?
ब वर्ग
अजित पवार
अ वर्ग
रतन भोसले
नितीन शेंडे
आतापर्यंत 21 जागांपैकी एका जागेवर अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलचा उमेदवार विजयी झाले असले तरी दोन ठिकाणी निळकंठेश्वर पॅनेलच्या उमेदवारांची आघाडी दिसून येत आहे. अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याची सत्ता स्वतःकडे राखण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सुरूवातीपासून आघाडी घेतलेल्या अजित पवारांच्या पॅनलने अद्यापही ती आघाडी टिकवून ठेवली आहे, त्यामुळे कारखान्याची सत्ता अजित पवारांच्या हातात जाणार असल्याची चर्चा आता बारामतीत रंगली आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने पहिल्या फेरीत विजय मिळवत सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या पॅनलच्या संपूर्ण यशाचे संकेत मिळत आहेत. मात्र, दुसरीकडे इतर पॅनल्सही जोरदार संघर्ष करत असल्यामुळे ही निवडणूक आता अधिक चुरशीची आणि रोचक वळणावर पोहोचली आहे. या निवडणुकीत अजित पवार यांना थेट 85 वर्षीय भाजपचे नेते आणि माळेगावचे माजी अध्यक्ष चंद्राराव तावरे यांचे आव्हान होते. त्याशिवाय एकूण चार पॅनल्स रिंगणात असल्याने ही लढत फारच अटीतटीची ठरत आहे. अजित पवार यांचा विजय ही निळकंठेश्वर पॅनलसाठी सकारात्मक सुरुवात असली, तरी अंतिम निकाल काय लागतो आणि कोण सत्तेवर येते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. पुढील काही तासांत या निवडणुकीचा अंतिम रंग स्पष्ट होणार आहे.
अजितदादांचा पहिला दणदणीत विजय
या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून ‘ब वर्ग गटातून’ उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. 102 पैकी 101 मतं वैध होती, यातील अजित पवारांना 91 मतं मिळाली आहेत. सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात. यामध्ये अजित पवारांनी बाजी मारली आहे. अजित पवार यांचे निळकंठेश्वर पॅनल विरुद्ध चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव पॅनलमध्ये मुख्य लढत होत असल्याचं चित्र आहे. बारामतीतील प्रशासकीय भवन मधील अभियांत्रिकी भवन येथे मतमोजणी सुरु आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चौरंगी लढत झाली होती.