देशभरात थंडीचा कडाका वाढत असताना हवामानाने पुन्हा एकदा यू टर्न घेतला आहे. अनेक राज्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालं असून अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहे. मागील आठवड्यात देखील अनेक भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. आता पुन्हा एकदा अवकाळीचं संकट उभं ठाकल्याने चिंता वाढली आहे.
ऐन संक्रांतीच्या दिवशीच भारतीय हवामान विभागाने देशातील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा दिला आहे. तर काही भागात बर्फवृष्टीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पुढील ४८ तासांत जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद जोरदार पाऊस होईल, असं IMD कडून सांगण्यात आलं आहे.
याशिवाय जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दक्षिण भारतात तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, किनारी आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात ईशान्य मोसमी पाऊस थांबण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.
त्यामुळे पुढील दोन दिवसांत या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवण्यात आली आहे. केरळ आणि लक्षद्वीपमध्ये कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. दक्षिण तामिळनाडूमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस होऊ शकतो, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.मागील आठवड्यात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. याचा रब्बी हंगामातील पीकांना मोठा फटका बसला होता.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील ढगाळ वातावरण निवळलं आहे. त्यामुळे पुन्हा थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत हलका पाऊस होईल, उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.