शेतकऱ्यांसाठी खूशखबर! ऊसाच्या भाव वाढीला मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहारावरील मंत्रिमंडळ समितीची बैठक पार पडली. या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ऊसाची एफआरपी 25 रुपये प्रति क्विंटल वाढवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. ही वाढ मोदी सरकारने केलेली सर्वाधिक वाढ आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारनं निवडणुकीपूर्वी देशातील 5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. हे 5 कोटींहून अधिक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी आहेत. सरकारने 2024-25 हंगामासाठी ऊसाची एफआरपी 25 रुपयांनी वाढवून 340 रुपये प्रति क्विंटल करण्यास मान्यता दिली आहे.

ऑक्टोबरपासून नवीन उसाचा हंगाम सुरू होत आहे. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ऊसाची भाववाढ करण्यात आली आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले की उस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने साखर हंगाम 2024-25 (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी उसाच्या वाजवी आणि लाभदायक किमतीत (FRP) 10.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. नवीन एफआरपी उसाच्या निश्चित फॉर्म्युल्यापेक्षा 107 टक्के अधिक आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांना फायदा होणार आहे. ते म्हणाले की, भारत देशात उसाला सर्वाधिक किंमत दिली जात आहे. सुधारित एफआरपी 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होईल.