वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी मध्ये पाण्याची समस्या खूपच भेडसावत आहे. अपुरा पाऊस यामुळे पाण्याची टंचाई इचलकरंजीवासियांना भासत आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी कमी झाल्यामुळे महापालिकेने पाणी उपसा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पंचगंगेच्या प्रदूषणामुळेही अनेकवेळा पाणी उपसा बंद केला जातो, तर कृष्णा योजनेच्या गळतीमुळे पाणीपुरवठा ठप्प होतो.
जानेवारी महिन्यात पाणी उपशाची ही परिस्थिती असेल तर मार्च नंतर पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करून महापालिकेने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. शहराला दररोज ५४ एमएलडी पाण्याची गरज आहे. कृष्णा योजनेतून ३२ एमएलडी तर पंचगंगेतून ९ एमएलडी उपसा केला जातो. आवश्यकतेपेक्षा कमी पाणी उपसा केल्यामुळे नागरिकांना दोन ते तीन दिवसांतून पाणीपुरवठा होतो.
सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी घटल्यामुळे पाणी उपसा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंचगंगेतून पूर्णपणे पाणी उपसा बंद आहे.
पंचगंगा नदीपात्र पुन्हा जलपर्णीने व्यापले आहे. नदीघाट परिसरात मोठ्या प्रमाणात सध्या जलपर्णी दिसून येत आहे. महापालिकेकडून जलपर्णी काढण्याचे काम सुरू असले तरी त्यावर मर्यादा येत आहेत. शहरातील काही सामाजिक संघटनांकडून जलपर्णी हटवण्याची मोहिम हाती घेतली जाते. मात्र, त्यामध्ये सातत्य नसल्यामुळे जलपर्णीचे संकट कायम आहे.