कबनूरकर अजूनही नगरपरिषदेच्या प्रतीक्षेत…..

कृती समितीच्या माध्यमातून कबनूर स्वतंत्र नगरपरिषद व्हावी, यासाठी लढा सुरू आहे. या संदर्भातील योग्य ती कागदपत्रे वेळोवेळी शासनास दिली आहेत. मागील वर्षी कृती समितीच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी खा.
धैर्यशील माने यांनी नगरपरिषद करून आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर कृती समितीने पुन्हा २४ दिवस धरणे आंदोलन व तीन दिवस आमरण उपोषण केले. त्या दरम्यान आ. आवाडे यांनी २६ जानेवारीला नगरपरिषद घोषित करू, असे आश्वासन देऊन उपोषण सोडण्यास सांगितले होते. त्या गोष्टीला दोन वर्षे उलटली तरी अद्याप कबनूरची नगरपरिषद झाली नाही.

कबनूर नगरपरिषदेची उद्घोषणा २६ जानेवारी २०२३ रोजी होणार असे आश्वासन आ. प्रकाश आवाडे यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये कबनूर नगरपरिषद कृती समितीला दिले होते. मात्र, त्यानंतर २६ जानेवारी २०२३ झाली, आता २६ जानेवारी २०२४ आली तरी कबनूर स्वतंत्र नगरपरिषदेचा प्रश्न शासनदरबारी भिजत पडला आहे. त्यामुळे जोपर्यंत कबनूर नगरपरिषद घोषित होत नाही, तोपर्यंत कबनूर नगरपरिषद कृती समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी बुधवार २४ जानेवारी २०२४ पासून पुन्हा दर्गा कट्ट्यावर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. याबाबतचे निवेदन कृती समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.