म..म.. मायमराठीचा… माझ्या मातृभाषेचा !

रयतेचा राजा छत्रपती शिवरायांनी मराठी राज्याची मुहूर्तमेढ रोवताना आपल्या भाषेचा स्वाभिमान बाळगला. हर हर महादेव या घोषणेने अवघा महाराष्ट्र दुमदुमून सोडला. राष्ट्र निर्माण व्हायचं असेल ,मान्यता पावायचं असेल आणि समृद्ध व्हायचं असेल तर स्वभाषाभिमान आधी जागृत व्हावा लागतो मगच देश पेटून उठतो ही दूरदृष्टी शिवरायांच्या ठायी होती. म्हणूनच त्यांनी राज्यकारभारासाठी मराठी भाषेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले.मराठीचा झेंडा स्वाभिमानाने फडकवला तो ज्ञानेश्वर काळापासून लेखन करीत असणाऱ्या अनेक मराठी सारस्वतांनी. ज्ञानदेवांनी संस्कृत भाषेतील गहन अध्यात्मिक ज्ञान मायमराठीत ,प्राकृतात आणले तेही अति रसाळ भाषेत .त्यांनी मराठीची गोडी लावली. तसेच अनेक संत महात्म्यांनी मराठीची पालखी उचलली. “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने” असे म्हणत तुकोबारायांनी मराठीची जपणूक केली. नाथांनी भारुडे लिहिली तर नामदेवांनी ही पालखी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून भारतभर नेली. माझ्या मराठी भाषेचा लावा ललाटास टिळा!जिच्या संघाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा!!असे म्हणत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांपासून अनेक कवींनी आपले मातृभाषेवरील प्रेम आपल्या कवितेतून वेळोवेळी व्यक्त केले आहे. कथा कादंबरीकार, नाटककार ,कवी, शाहिर या सर्वांनी आपल्या शब्दांची मौक्तिकमाला देवी सरस्वतीच्या कंठी अर्पण केली आहे. सर्व साहित्यिकांनी आपल्या लेखणीने मराठी भाषेत अद्वितीय अशी कामगिरी केली आहे.पण आजच्या माहिती तंत्रज्ञान युगात आपली मराठी भाषा हरवून जाते की काय याची मनात भीती वाटू लागली आहे. शहरापासून अगदी वाड्या वस्त्यातील घराघरातून “अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं” या गाण्याऐवजी “Twinkle twinkle little star “यासारखी इंग्रजी बडबडगीतं आपणास ऐकू येऊ लागली आहेत. इंग्रजी भाषा ही महत्त्वाची आहेच पण त्यासाठी मातृभाषेला कमी लेखू नये. यामुळे माय मराठीचं अस्तित्व टिकून राहील का असा प्रश्न मनामध्ये निर्माण होत आहे. मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानं ठोस पाऊल उचलायला हवं. आधुनिक तंत्रज्ञानात आपली माय मराठी तग धरून राहावी, टिकावी यासाठी तिला सुसज्ज करणे हे आपलं कर्तव्य आहे. कारण कोणत्याही समाजातील प्रतिभेला स्फुरण चढतं ते त्या समाजातील भाषेतूनच. साहित्य अंकुरतं , बहरतं तेही मातृभाषेतूनच. संस्कार होतात तेही मातृभाषेतूनच. भाषा ही संस्कृतीची वाहक असते. आपली मातृभाषा आपण जेव्हा विसरतो तेव्हा आपल्या संस्कृतीकडे पाठ फिरवण्याची ती चिन्हं असतात. व्यापाराची ,उद्योगाची, व्यवहाराची भाषा कितीही प्रगत असली तरीही समाजाची अस्मिता ,संस्कृती,संस्कार आणि अंतरंग यांचे प्रकटीकरण त्यातून होत नाही. म्हणूनच भाषा हरवणे म्हणजे संस्कृती हरवणे संस्कार हरवून सत्त्व गमावणे होय.मातृभाषा लोकांमध्ये राहायला हवी .बोलली जायला हवी आणि संस्कृतीचे संचित पुढे न्यायला हवी. मातृभाषा शिकवायला हवी ती यासाठीच. प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हावे यासाठीचा पालकांनी आग्रह धरावा. कारण जगातील कोणतेही ज्ञान ग्रहण करण्यासाठी मातृभाषेइतके समर्थ साधन, माध्यम दुसरे कुठलेही नाही. पण सध्याच्या यंञणेमध्ये मराठी बोलणं, लिहणं… मागासलेपणाचे लक्षण मानलं जातं…पण यात काही तथ्य आहे का हे समजून घेऊन मातृभाषेला बळकटी आणण्यासाठी प्रयत्नशील राहणे…तशी पावले उचलणे म्हणजेच ख-या अर्थाने मराठी राजभाषा दिन साजरा करणे होय.— सौ.विद्या नलवडे , कोल्हापूर