इचलकरंजीतील थोरात चौक, स्टेशन रोडवरील अतिक्रमणे हटवले …

थोरात चौक तसेच स्टेशन रोडवरील बंद अवस्थेत असलेले अतिक्रमणे आज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने काढली. त्यामुळे नागरिक तसेच वाहनधारकातून या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच सदरची कारवाई शहरातील अन्य भागांमध्येही राबवून रस्ते तसेच चौक अतिक्रमण मुक्त करावेत, अशी मागणी होत आहे. शहरात दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढताना दिसत आहेत. बुहतांश अतिक्रमणांना राजकीय बळ असल्याचेच दिसते. यामध्ये खाद्यपदार्थ गाड्या तसेच
अतिक्रमण हटविताना महानगरपालिकेचे कर्मचारी. पान टपऱ्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे.

या अतिक्रमणामुळे रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत चालले आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे दिसते. सांगली रोडवर महासत्ता चौक ते जय सांगली नाका, मरगुबाई मंदिर ते नदी रोड, एसटी स्टँड ते कोल्हापूर नाका तसेच संभाजी चौक यासह अनेक ठिकाणी अतिक्रमणे होत आहेत. विकली मार्केट परिसरातही अनेक दुकानदारांकडून आपले साहित्य, फलक थेट रस्त्यावर ठेवले जाते. येथील काही स्क्रॅप विक्रेत्यांकडून दोन्हीबाजूनी रस्ता व्यापून टाकला आहे .

याशिवाय काही खाद्यपदार्थाचे हातगाडे, पान टपऱ्यामुळे अतिक्रमणात वाढत होत असून रस्ता अरूंद होत आहे. याकडेही अतिक्रमण निमुर्लन पथकाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.तसेच महापालिका अतिक्रमण निर्मुलन पथकाने थोरात चौक स्टेशन रोडवरील काही बंद अवस्थेतील अतिक्रमणे हटवून खोकी तसेच हातगाड्या जप्त केल्या आहेत. अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख श्री आवळे यांच्या नेतृत्वाखाली गणेश पुजारी, श्री. जावळे, धोंडीराम कांबळे, प्रकाश हेगडे, कुदरत गोलंदाज या पथकाने सदरची कारवाई केली.