ग्रामपंचायतीसाठी थकबाकी वसुली ठरतेय डोकेदुखी!

थकबाकी वसुलीसंदर्भात ग्रामसभेत वारंवार चर्चा होत असते. त्यादरम्यान थकबाकीदारांची नळ कनेक्शन बंद करणे, नावे डिजिटल फलकावर प्रसिद्ध करणे या घोषणा केल्या जातात, त्या केवळ कागदावरच राहतात. वेळीच ठोस पाऊल न उचलल्याने थकबाकी वसुली मोठे आव्हान बनले आहे.

रेंदाळ येथील कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीमुळे ग्रामपंचायत यंत्रणा कोलमडली आहे. कारभाऱ्यांना कारभार हाकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. थकबाकीदारांची नावे डिजिटल फलकावर प्रसिद्ध करणे, आवश्यक दाखले, उतारे थकबाकीदारांना न देणे आदी कठोर निर्णयाच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या. त्यामुळे वसुलीचा मार्ग खडतर बनला आहे. वसुलीसाठी कठोर निर्णयाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे; अन्यथा गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

कर्मचारी पगार, वीज बिल, मोडतोड, देवाण-घेवाण या बाबी हाताळताना कारभाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोट्यवधींचा कर थकीत असल्याने वसुली यंत्रणा आणखी गतिमान करणे गरजेचे आहे. कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
सरपंच, सदस्य, कर्मचारी यांनी वसुलीसाठी कंबर कसणे आवश्यक आहे. याबरोबरच कठोर निर्णय अंमलात आणून थकबाकी विरोधात ठोस पाऊल उचलावे लागेल; अन्यथा भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.