कोल्हापूर काँग्रेसला सोडण्याच्या बदल्यात सांगलीची दिली आहुती!

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जागा वाटपात सांगली लोकसभा मतदार संघ अचानक शिवसेना (ठाकरे) पक्षाने मागितला आणि काँग्रेससाठी सरळ वाटणारी वाट अधिक बिकट झाली. ‘कोल्हापूर’ काँग्रेसला सोडण्याच्या बदल्यात ‘सांगली’ची आहुती दिली जात असल्याची चर्चा आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) याच्या आज होत असलेल्या सेनाप्रवेशाची ‘स्क्रीप्ट’ सहज की ठरवून, याची आता चर्चा सुरू झाली आहे.कोल्हापूरला श्रीमंत शाहू महाराजांनी ‘लढेन तर कॉंग्रेसकडून (Congress) अशी अट घातल्याने शिवसेनेला तडजोड करावी लागली.

तेव्हा कोल्हापूर सोडले, तर पश्‍चिम महाराष्ट्रात ठाकरेंची ‘मशाल’ पेटणार कुठे? मग महाआघाडीत सांगलीचा पर्याय पुढे आला की आणला गेला? त्यातून शिवसेना-काँग्रेसमध्ये सध्या कमालीचे वातावरण तापले आहे. सेना खासदार संजय राऊत यांनी सन २०१९ ला हा मतदार संघ स्वाभिमानीला सोडला असल्याचा दाखला देत ‘सांगली’त काँग्रेस लढतेयच कुठे,’ असा सवाल केला आहे.त्यानंतर गेले काही महिने लांग बांधून तयार असलेले चंद्रहार पाटील अचानक शिवसैनिक झाले असून, अनेक पिढ्यांचे निष्ठावान शिवसैनिक रातोरात त्यांचे समर्थक झाले आहेत. आता चंद्रहार यांची एकूण तयारी पाहता, त्यांनी शब्द घेतल्याशिवाय ‘शिवबंधन’ बांधले नसावे, हे नक्की. आता ठाकरेंच्या शिवसेनेची  (Shiv Sena) मतदार संघात ताकद किती हा प्रश्‍नच बाजूला पडला आहे. त्याची कल्पनाही उद्धव ठाकरे यांनादेखील झाली आहे. नवख्या चंद्रहार पाटील यांना ‘सांगली’तून लढवण्याचा शिवसेनेचा आग्रह कशासाठी, हा प्रश्‍न सर्वांनाच बुचकळण्यात टाकणारा आहे.

ज्या पक्षाकडे स्वतःचा उमेदवार नाही, तो या जागेसाठी आग्रही का, हे यथावकाश स्पष्ट होईल. आता कोऱ्या पाटीचे चंद्रहार भाजपसाठी सोयीचे की गैरसोयीचे, याचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीची साथसोबत मिळणार का? काँग्रेस आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वक्तव्यातून त्याची चुणूक मिळाली आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाने सांगली मतदार संघाची मागणी करताना विशाल पाटील यांच्या नावावरदेखील प्राधान्याने विचार केला. ‘सांगली’ मिळालीच तर विशाल लढतील का, याची चाचपणी करण्यात आली.त्याला विशाल यांनी नकार दिल्याचे सांगण्यात आले.

तोवर चंद्रहार पाटील हे वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात होते. ‘वंचित’ महाविकास आघाडीचा घटक होईल, अशी शक्यता वाटू लागल्यानंतर आणि शिवसेना सांगली ठामपणे मागत असल्याचे लक्षात आल्यानंतर चंद्रहार यांना ‘मातोश्री’चे दरवाजे उघडून देण्यात आले. या घडामोडी इतक्या वेगवान आहेत की यामागचा ‘मास्टर माईंड’ कोण, याचीही चर्चा रंगते आहे.