आगामी काळात इचलकरंजी शहरात होणार पाण्याचे नियोजन!

इचलकरंजी शहरात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तश्यातच पाईपलाईन गळती सतत लागत असल्याकारणाने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागतेच. इचलकरंजी शहरामध्ये अनेक ठिकाणी बोअर हे बंद अवस्थेत दिसून येत आहेत. कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिन्या बदलण्याचे काम मार्चअखेर पूर्ण होईल तसेच शहरातील सर्व ठिकाणच्या बंद असलेला कुपनलिकांचा सर्वे करून त्या पूर्ववत चालू करून शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जाईल, असे आश्वासन उपायुक्त तैमुर मुल्लाणी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळास दिले.

दरम्यान, पाणी पुरवठ्याची उपाययोजना वेळेत न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आंदोलन उभारण्याचा इशारा याप्रसंगी देण्यात आला. येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकरंजी शहराच्या वतीने महानगरपालिका उपायुक्त तैमुर मुल्लाणी यांना पिण्याचे पाणी या विषयावर निवेदन देण्यात आले.

या निवेदनामध्ये असे म्हटले आहे कि, सध्या शहरात पाणी प्रश्न हा ज्वलंत बनला असून पाण्यामुळे सर्व नागरीकांची वणवण होत आहे. गेली कित्येक दिवसापासून शहराला सुरळीतपणे पाणी पुरवठा होत नाही. आठ-आठ दिवस शहराला पाणी मिळत नाही. यामुळे नागरिकांची धावाधाव होत आहे. पंचगंगा उपसा बंद केला आहे, कृष्णा योजनेची गळती सुरूच असते. यावर ठोस उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे अशावेळी शहराला निसर्गाच्या कृपेवर अवलंबून तुम्ही ठेवला आहात. तुम्ही महापालिका प्रशासन म्हणून यावर कोणता उपाय केला आहे. याबाबतची माहिती लोकांसमोर स्पष्ट करून पाण्याची उपाययोजना करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तिव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.