इचलकरंजीत पुन्हा अतिक्रमणात वाढ…


    इचलकरंजी शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध चौकातील अतिक्रमणाचा प्रश्न नित्याचाच बनला आहे. दिवाळी सण झाल्यानंतर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाच्यावतीने अतिक्रमणाविरोधात कारवाई होईल अशी अपेक्षा होती मात्र तशी कारवाई न झाल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध चौकात छोटे-मोठे विक्रेत्यांनी रस्त्यावरच आपला व्यवसाय थाटल्याचे दिसत आहे. त्याचा नाहक त्रास नागरिकांसह वाहनधारकांना सोसावा लागत आहे. तेव्हा महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने अतिक्रमणविरोधात कारवाई सुरू करावी, अशी मागणी होत आहे. इचलकरंजी शहराची ओळख उद्योग नगरी म्हणून परिचित आहे.

    शहरात वस्त्रोद्योगासह इतर उद्योगांची संख्या लक्षणीय आहे. जागा मिळेल त्या ठिकाणी लहान – मोठे उद्योग थाटले आहेत. त्यामुळे शहराची वाढ नियोजन पध्दतीने झाली नसल्याचे दिसून येते. शहरात छोट्या विक्रेत्यांसाठी ठराविक जागा आरक्षित न केल्यामुळे बाहेरून तसेच शहरातील छोटे-मोठे विक्रेते मिळेल त्या ठिकाणी आपला व्यवसाय मांडून बसत असतात. बऱ्याच वेळेला महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून कारवाई केली जाते. अनेक वेळेला राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई थांबवली जाते.