लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आजपासून (शनिवारी) लागू होणार असल्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नेमलेली ४६ भरारी पथके व जिल्ह्याच्या सीमेवर नेमलेली ५२ पथके शनिवारपासूनच जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू करतील.
मतदान केंद्रे, संवदेनशील केंद्रे निश्चित झाली असून, निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे.सोलापूर जिल्ह्यात यंदा लोकसभा निवडणुकीसाठी ३५ लाख ७८ हजार ९७२ मतदार आहेत. मतदानाची टक्केवारी वाढावी, इव्हीएमबाबतचे गैरसमज दूर व्हावेत, ज्यांना इव्हीएम वापरायला जमत नाही त्यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र मोहीम राबविली आहे.
आता जिल्ह्यात चार हजार ८०० कंट्रोल युनिट (मशिन) तयार असून, एकूण मतदान केंद्राच्या २५ टक्के जादा मशिन देण्यात आल्या आहेत. पण, सोलापूर जिल्ह्यात चार टक्के मशिन (१६२) कमी होत्या, त्यात चार दिवसांपूर्वी वाढ करण्यात आली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे नांदणी, मरवडे, वाघदरी येथे सीमा तपासणी नाके तयार केले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक मद्यविक्री दुकानांमध्ये किती विक्री झाली, याची माहिती घेतली जाणार आहे. तसेच जिल्ह्याअंतर्गत व जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या संशयास्पद वाहनांची तपासणी केली जाणार असून ढाबे-हॉटेल्सवर छापेमारी होणार आहे.
अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांवर देखील कडक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सहा पथके व एक विशेष पथक नेमले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली.