दुष्काळामुळे सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग अडचणीत…

यावर्षी तीव्र उन्हाळा आणि त्यातच उजनीचे चुकलेले पाणी नियोजन यामुळे सोलापूर जिल्ह्यात ऊस शेतीला मोठा फटका बसला आहे. परिणामी यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखान्यांवर देखील मोठे संकट निर्माण झाले आहे.राज्यात सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत. परंतु यंदा हे साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत. गतवर्षी कमी पाऊस झाला होता. त्यामुळे उजनी धरण ७० टक्के भरले होते.

त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा फटका ऊस शेतीला बसला आहे. पाण्याची समस्या सर्वदूर असल्याने शेतातील पिकांना पाणी देणे शक्य होत नाही. सोलापूर जिल्ह्यात देखील पाणी टंचाई जाणवत असल्याने ऊस पीक धोक्यात आले आहे.सध्या तीव्र पाणी टंचाईमुळे पंढरपूर परिसरातील ऊस पिके पाण्याअभावी फडातच जळून गेली आहेत. तसेच टनाला ३ हजार भाव घेणारा ऊस सध्या वैरणीला ५०० रूपये गुंट्यानुसार विकला जात आहे. पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने साखर पट्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहे. ऊस कमी झाल्याने अनेक साखर कारखाने अडचणीत आले आहेत.‌