Weather Updates: २७ मार्चपर्यंत राज्यातील…..

राज्यातून थंडी गायब झाली असून उकाड्यात वाढ झाली. राज्यातील नागरिकांना गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असताना पुढील चार दिवस तापमान चाळीशी पार जाण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २७ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि विदर्भासह राज्यातील अनेक भागात उन्हाचे चटके जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

यावेळी उन्हाळा जास्त कडक असणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार मार्च महिन्यातच तापमानात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत काल ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, आज तापमान ३८.७ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पुण्यातही अशीच परिस्थिती आहे. पुण्यात आज कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस असेल.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलेल्या विदर्भातील वातावरणातही बदल होताना दिसत आहे. पाऊस आणि गारपिटीमुळे तापमानात घट झाली होती. पण गेल्या दोन दिवसांपासून पाऊस थांबला आहे. यामुळे तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. विदर्भात आज तापमान ३६ ते ३७ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे