सीमाभागातील मराठी मतदारांची मोठी संख्या असणाऱ्या उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने मोठा डाव टाकताना कोल्हापूरच्या सूनबाई आणि कर्नाटकमधील (Karnataka) वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्या सुविद्य पत्नी डाॅ. अंजली निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे.
डॉ. अंजली निंबाळकरांच्या उमेदवारीने प्रथमच भाजपचे खासदार आणि सातत्याने वादग्रस्त विधाने करून भाजपलाच अडचणीत आणलेल्या अनंतकुमार हेगडेंसमोर आव्हान ठाकले आहे. प्रस्थापित खासदारांविरोधी लाट तसेच मराठा आरक्षणासाठी आग्रही भूमिका मांडलेला मराठा चेहरा असलेल्या अंजली निंबाळकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने 2004 सालापासून खासदार असलेल्या अनंतरकुमार हेगडे यांच्यासाठी ही लढत सोपी नसेल. अंजली निंबाळकर या 2018-23 या दरम्यान बेळगावातील खानापूरच्या आमदार होत्या. यावेळी त्यांनी आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवत विकासकामांचा डोंगर उभा केला आहे.
अंजली निंबाळकर या मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील उमरगामधील आहेत. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या नात असल्याने त्यांना राजकारणाचे बाळकडू घराण्यातूनच मिळाले आहे. तसेच त्या कर्नाटकातील धडाडीचे आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी आहेत. अंजली निंबाळकर या पेशाने डाॅक्टर असून त्यांनी मुंबईत स्त्रीरोगतज्ज्ञ क्षेत्रातील उच्च शिक्षण पूर्ण केले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर बेळगावच्या सिव्हील रुग्णालयामध्ये त्यांनी कर्तव्य बजावले. यावेळी ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांची आरोग्याची आणि आर्थिक परिस्थिती पहिल्यानंतर राजकारणाचा येण्याचा निर्णय घेतला.