पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सीमारेषेवर सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धविराम झाला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून पाकिस्तानला सातत्याने इशारा दिला जात आहे. भारत दहशतवादी कारवाया कदापि खपून घेणार नाही, तसेच पाकिस्तानने पुन्हा भारताविरुद्ध नापाक कृती केल्यास भारताकडून जोरदार प्रत्त्युत्तर दिलं जाईल, असे ठणकावून सांगितलं जात आहे. भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती आज संरक्षणमंत्र्यांनी दिली. ऑपरेशन सिंदूर संपलं नसून पाकिस्तानने परत चूक केल्यास त्यांना सुधारायलाही वेळ मिळणार नाही, अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी गोवा येथे नौदलाच्या आयएनएस विक्रांत युद्धनौकेवरुन सैन्य जवानांना संबोधित करताना पाकिस्तानला इशारा दिलाय.
आमचं नौदल त्सुनामी आणू शकतं, पाकिस्तानकडून सातत्याने चर्चा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कालच, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी चर्चा करण्यासाठी फोन केला होता. पाकिस्तानने हाफिज सईद आणि मसूद अजहर यांना भारताकडे सोपवावे. कारण, मुंबई दहशतवादी हल्ल्यात हाफीज सईदचा सहभाग होता, त्याचा हिशोब करायचा आहे. दहशवादाविरुद्ध आम्ही अशा कारवाया करुन ज्याचा पाकिस्तान विचारही करू शकणार नाही. आता, पाकिस्तानने कुठलाही अनुचित प्रकार केला तर, आमचं नौदल पहिल्यांदा हल्ला करेल, अशा शब्दात संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. भारतीय नौदलाने सुरुवात केल्यावर पाकिस्तानचं काय होईल, हे देवालाच माहिती. यावेळी, जर नौदलाने सहभाग घेतला तर पाकिस्तानचे 4 तुकडे होतील. कारण, 1971 साली नौदलाने लढाईला सुरुवात केल्यानंतर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते, अशी आठवणही राजनाथ सिंह यांनी करुन दिली.
भारतीय नौदल जेव्हा कारवाई करते, तेव्हा काय होतं हे पाकिस्तानला देखील माहिती आहे. भारत कुठल्याही परिस्थितीत आणि कधीही चोख प्रत्त्युत्तर देण्यास तयार आहे. आमच्या सैन्य दलाचं मनोबल हे हिमालयासारखं मोठं आहे. ऑपरेशन सिंदूरवेळी भारतीय नौदलाने पाकिस्तानला त्यांच्या तटबंदीवर रोखून ठेवलं होतं. आपला हल्ला एवढा जोरदार होता की, पाकिस्तान जगभरातील देशांसमोर जाऊन विनवणी करू लागला. आपल्या नौदलातील युद्धनौकांनी दहशतवादी हल्ल्यानंतर 96 तासांतच पूर्व आणि पश्चिमी तटबंदीवर सतर्क राहून हवेत मिसाईल टाकल्या होत्या, अशी माहितीही संरक्षणमंत्र्यांनी दिली.