मंगळवेढा तालुक्यात गुटखा विक्री राजरोसपणे सुरु

मंगळवेढा तालुक्यात गुटखा राजरोसपणे विकला जात आहे. मात्र, असे असताना अन्न व औषध प्रशासन मूग गिळून गप्प आहे. गुटखा विक्रीचा विळखा वाढला आहे. त्यात गुटखा पुरवठा करणाऱ्या या मोठ्या माशांनाच जाळ्यात घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.मंगळवेढा तालुक्यात गुटख्याच्या पाठोपाठ आता माव्यातूनही लाखोंची उलाढाल होत आहे. माव्यातून अनेकांना रोजगार निर्माण झाला असला, तरी शासनाने गुटखा व मावा विक्रीवर बंदी लागू केली.

मात्र, तालुक्यात या बंदीच्या निर्णयाचा काहीच फरक पडलेला दिसत नाही. गुटखा प्रकरणाचा चटका काही पोलिस अधिकाऱ्यांनादेखील बसला आहे. गुटखा कारवाईतील वाहन सोडून दिल्याप्रकरणी दोन ते तीन पोलिस अधिकारी निलंबित झाले आहेत.गुटख्याचे व्यसन नव्याने निर्माण होणारा वर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. साधारणपणे कॉलेजच्या मुलांमध्ये गुटख्याचे व्यसन मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तालुक्यात सध्या रस्त्यालगत, शहराच्या चौकात व प्रमुख रस्त्यांवर व किराणा दुकाने,

तसेच महामार्गावर, पानटपरीचालक छुप्या पद्धतीने गुटखा व मावा विक्री करतात. गुटखाबंदी असल्याने अचानक माव्याला मोठी मागणी वाढली. मात्र, २०१३ मध्ये माव्यावरही बंदी आणली. सुरुवातीच्या काळात छुप्या पद्धतीने विक्री सुरू राहिली.मात्र, या बंदीचा काहीच परिणाम झाला नाही. ही बंदी फक्त कागदवरच राहिली. त्यामुळे गुटखा व मावा विक्री दुकानदारांनी आता खुलेआम गुटखा विक्री सुरू केली आहे.शहरासह तालुक्यात गुटखा खुलेआम विक्री सुरू आहे. तरुण पिढी गुटख्याच्या आहारी गेली असून कर्करोगाला अनेकजण बळी पडले आहेत. गुटखा विक्रीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याबद्दल सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.