माळशिरसमधून ‘तुतारी’च्या उमेदवारावर मोहिते-पाटलांकडून शिक्कामोर्तब! राम सातपुते की….

विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून माळशिरसचे आमदार राम सातपुते हे मतदारसंघात सक्रिय दिसत नसल्याचं बोललं जात आहे. यातच माळशिरसमधून उत्तमराव जानकर हे महाविकास आघाडी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) उमेदवार असल्याचं खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.मात्र, भाजपकडून राम सातपुतेच पुन्हा उमेदवार असतील की अन्य कुणी? याबाबत महायुतीची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि मोहिते-पाटील विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांचा 74 हजारांच्या आसपास मतांनी पराभव केला. दुसरीकडे, धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा मतदारसंघात रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा पराभवाची धूळ चारली. सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे दोन खासदार निवडून आल्यानं राजकीय गणिते बदलली आहेत.

आता महाविकास आघाडीला विधानसभेचे वेध लागलं आहे. यातच मंगळवारी धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरसमधून उत्तमराव जानकर हेच उमेदवार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे भाजपमधील काहीजण यावेळी आमदार राम सातपुते यांना उमेदवारी नाही, असं म्हणत गुडघ्याला बाशिंग बांधून फिरताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत भाजपचे राम सातपुते उमेदवार नसतील, तर उत्तमराव जानकर यांच्यासाख्या तगड्या नेत्यासमोर उमेदवार कोण असणार? असा सवाल उपस्थित होत आहे.