‘समृद्धी’वरील 12 जणांच्या मृत्यूला RTO जबाबदार

विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर शनिवारी (१५ ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास एका खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर २३ प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, हा अपघात आरटीओ अधिकाऱ्यांच्या वाटमारीमुळे झाला असल्याचा आरोप केला जात आहे.

आरटीओ अधिकाऱ्यांनी महामार्गावर तपासणी करताना एक ट्रक अडवला होता. भर रस्त्यातच या ट्रकची चौकशी सुरू होती. त्याचवेळी पाठीमागून खासगी ट्रॅव्हल्स आली आणि हा अपघात झाला. दरम्यान, अपघाताच्या  काही वेळ आधीचा ट्रक थांबवलेला व्हिडीओ आता समोर आला आहे.

या व्हिडीओत आरटीओचे अधिकारी ट्रकचालकाची चौकशी करताना दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे भर रस्त्यातच ही चौकशी सुरू आहे. जर आरटीओ अधिकाऱ्यांनी रस्त्यावर ट्रक अडवला नसता, किंवा ट्रकला बाजूला घेऊन चौकशी केली असती, तर हा अपघात झाला नसता, असं अनेकांचं म्हणणं आहे.

आरटीओच्या या चुकीमुळेच १२ प्रवाशांचा जीव गेला, असा आरोपही अनेकांकडून केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन आरटीओ अधिकाऱ्यांसह एका चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

यासंदर्भातील माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली आहे. दोन्ही आरटीओ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी मीटिंग बोलवून दोन्ही अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.