मित्रपक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचे मानेंपुढे आव्हान!

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात संजय मंडलिक यांनी नाराजी नाट्यावर मात करीत सर्वसमावेशक प्रचाराला सुरुवात केली असताना तिकडे हातकणंगले मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांच्यावर मित्रपक्षांच्या नेत्यांची मनधरणी करण्याची वेळ आली आहे. केंद्रीय रसायन खत मंत्रालयाचे संचालक संजय पाटील यांनी बोलावणं आल्याशिवाय नाही असे म्हणत थेट प्रचार करणार नाही अशी टोकाची भूमिका घेतली आहे.

खेरीज, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना घरात उमेदवारी मिळाली नसल्याने नाराजी आहे. विकास कामांच्या निधीवरून गुरुदत्त कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाडगे यांच्याशी वाद झडला आहे.

त्यामुळे साखर कारखान्याचे नेतृत्व करणाऱ्या मातब्बराची नाराजी दूर करणे हे माने यांच्यासमोर आव्हान असणार आहे.जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात विद्यमान खासदारांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागला. फार काळ लांबलेले हे प्रकरण अखेर अलीकडेच निवळले आहे.

कोल्हापुरात संजय मंडलिक व हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने यांना पुन्हा रिंगणात उतरवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. धनुष्यबाण खांद्यावर घेऊन दोन्ही खासदारांनी प्रचाराला सुरुवात करताना नमनालाच नाराजी नाट्याला सामोरे जावे लागले आहे.