लोकसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाला असला तरी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार कोण असणार याची शाश्वती अजूनही मतदारांना आलेली नाही.त्यामुळे लढत कशी असणार याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही.
कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसकडून शाहू महाराज यांचे नाव आणि हातकणंगलेमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव निश्चित असलं तरी त्यांच्या विरोधातील उमेदवार अजूनही ठरलेला नाही. त्यामुळे ही लढत कशी होणार याबाबत अजूनही चर्चा सुरूच आहे.
दरम्यान, राजू शेट्टी यांनी दुसऱ्यांदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने हातकणंगले मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आपल्याला सोडावा, अशी मागणी शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टी यांना मशाल चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिला होता.
मात्र,राजू शेट्टी यांनी गेल्या 25 वर्षांपासून मी पक्षाच्या चिन्हावर लढत असल्याचे सांगत मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. संघटनेच्या माध्यमातून निवडणूक लढवली असून आयुष्यात इतर पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवली नसल्याचे त्यांनी ठाकरे यांना सांगितले.