हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांअभावी रुग्णाची गैरसोय! नागरिकातून संताप

हातकणंगले येथील ग्रामीण रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी आठवड्यातून दोनवेळा हजेरी लावत आहेत, तर दोन कंत्राटी महिला डॉक्टर खासगी दवाखाना सांभाळून वेळ मिळाला तर ग्रामीण रुग्णालयाकडे येत असल्याने रुग्णालयाची ९ वाजताची ओ.पी. डी. १० सुरू केली जाते तसेच सायंकाळी ४ ची ओ.पी. डी. बंदच ठेवली जात असल्याने उपचाराअभावी रुग्णांना घरचा रस्ता दाखविला जात आहे. डॉक्टर वेळेवर नसल्याने रुग्णांना तासनतास तिष्ठत बसावे लागत आहे.

ग्रामीण रुग्णालयाचा कारभार आयो जाओ अशा वृत्तीमुळे रामभरोसे झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनउभारलेल्या रुग्णालयातून सेवाच मिळत नसल्याने रुग्ण आणि नागरिकातून संताप व्यक्त होत आहे.ग्रामीण रुग्णालयामध्ये दररोज शंभर ते दीडशे रुग्ण केस पेपरच्या पाळीत उभे असताना मुख्य वैद्यकीय अधिकारी आठवड्यातून दोनच दिवस रुग्णालयाकडे येत असल्याने इतर कर्मचारी वेळ मिळेल तसे सोयीप्रमाणे रुग्णालयाचे कामकाज सांभाळत आहेत.

शासनाने दोन महिला डॉक्टर कंत्राटी भरती केल्या आहेत. त्या आपली खासगी दवाखान्याची सेवा पूर्ण करून वेळ मिळाला तर रुग्णालयाकडे येत असल्याने रुग्णाची केस पेपर ओ.पी.डी. ची ९ वा.वेळ असताना १० वा सुरू केली जात आहे. ती दुपारी १ वाजता बंद केली जाते. केस पेपर काढून रांगेत उभ्या असलेल्या रुग्णांना डॉक्टराची वाट बघावी लागत आहे. दुपारी ४ ची ओ.पी.डी. बंद आहे. यामुळे रांगेत उभ्या असलेल्या रुग्णांना थेट घराचा रस्ता दाखविला जात आहे.