आगामी काळात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार….

महाराष्ट्रात गेल्या तीन-चार वर्षांमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. महाराष्ट्रातील जनता गेल्या तीन वर्षांपासून मोठा राजकीय सत्तासंघर्ष पाहतेय. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून महाराष्ट्रात वेगळ्या युत्या आणि आघाड्या तयार झाल्या. महाराष्ट्रातील दोन मोठे पक्ष फुटले आणि चार वेगवेगळे गट तयार झाले. या गटांमध्ये टोकाचा संघर्ष चालू आहे.

अशातच या गटांनी अनेक लहान-मोठ्या पक्षांबरोबर तडजोडी केल्या. शिवसेनेच्या ठाकरे गटानेही वेगवेगळ्या पक्षांबरोबर आघाडी केली आहे. शिवसेना फुटल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येण्याची चर्चादेखील झाली. परंतु, हे दोन्ही भाऊ एकत्र आले नाहीत. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.संजय राऊत यांना यावेळी विचारण्यात आलं की, तुम्हाला आगामी काळात दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची काही शक्यता दिसतेय का? या प्रश्नावर राऊत म्हणाले, ते दोघे (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) भाऊ आहेत. हे दोन्ही भाऊ एकत्रच आहेत. कुटुंब म्हणून ते एकत्रच आहेत.

फक्त त्यांचे राजकीय मार्ग वेगळे आहेत. कुटुंब कायम राहतं, नाती टिकवली जातात, कुटुंब म्हणून दोघेही एकत्रच आहेत. त्यांचे चांगले संबंध आहेत आणि आम्हीदेखील (शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक) दोघांशी चांगले संबंध ठेवतो. त्यात काहीच गैर नाही. महाराष्ट्र आणि मराठी माणूस इतका दिलदार तर नक्कीच आहे.काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी राज ठाकरे यांना दिल्लीत भेटीसाठी बोलावलं होतं. या भेटीनंतर भाजपा-मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.