शिवसेना ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का!

शिवसेनेत बंड झाल्यापासून उद्धव ठाकरे यांना अनेक धक्के बसत आहेत. अनेक विश्वासू लोकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना उद्धव ठाकरे यांना पुन्हा एक धक्का बसणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला हा मोठा धक्का असणार आहे. नाशिकमधील शिवसेना नेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप आज ६ एप्रिल रोजी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

बबनराव घोलप यांचा आज संध्याकाळी चार वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते ठाकरे गटात नाराज होते. शिर्डीच्या उमेदवारीत डावल्याने बबनराव घोलप नाराज होते. यामुळे आज ते शिंदे गटात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाऊसाहेब चौधरी यांच्या मध्यस्थीने बबनराव घोलप शिंदे गटात जाणार आहे.

माजी मंत्री राहिलेले बबनराव घोलप उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार आहे. परंतु त्यांचे पुत्र योगेश घोलप यांची भूमिका मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार की उद्धव ठाकरे बरोबर राहणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घोलप यांच्यासोबत आणखी काही पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची शक्यता आहे.