ठरलं तर! कल्याणमधून श्रीकांत शिंदे हेच लोकसभेचे उमेदवार

गेल्या अनेक दिवसांपासून कल्याणच्या जागेवरून महायुतीत धुसफूस चालू आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा सांगितला होता. याच कारणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असूनही विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली नव्हती. दरम्यान, या जागेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी मोठी षणा केली आहे. कल्याणच्या जागेवर श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील, असं फडणवीस म्हणाले आहेत. फडणवीसांच्या या घोषणेमुळे आता भाजपचे कल्याणचे स्थानिक नेतृत्व काय निर्णय घेणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. 

ठाणे कल्याणच्या भाजपच्या नेत्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. या नेत्यांनी आपली नाराजी फडणवीस यांच्याकडे बोलूनही दाखवली होती. विशेष म्हणेज श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांच्या प्रचाराचे काम करणार नाही, असा टोकाचा निर्णयही भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी घेतला होता. त्यानंतर आता खुद्द फडणवीस यांनीच श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.