आपल्या पाठीमागे ईडी आणि शहाणी असं कुणीच लागत नाही, अशी मिश्किल टिप्पणी शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली आहे. ज्यांच्यापाशी काहीतरी दडलंय, त्याच्याजवळ ईडी जात आहे.धूर निघत असेल तर ओळखा खाली विस्तव आहे, त्यामुळे ईडी त्याच्याच मागे लागते, असं शहाजी बापू म्हणाले आहेत. ईडी काय आहे हे भुजबळ साहेबांनी आपल्याला बाकड्यावर बसून अर्धा तास सांगितल्याचा टोलाही शहाजी बापू पाटील यांनी लगावला आहे.
शहाजी बापू पाटील माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात शहाजीबापू पाटील बोलत होते. शहाजी बापू पाटलांनी या कार्यक्रमात बोलताना मोहिते पाटलांवरही भाष्य केलं. जिथे वाटोळं झालं त्या बारामतीकरांकडे मोहिते पाटलांनी जाऊ नये, असं शहाजीबापू पाटील म्हणाले आहेत.’मोहिते पाटील कुटुंबाने धाडसाने वेडेवाकडे राजकीय पाऊल टाकू नये, ज्या ठिकाणी त्यांच्या राजकारणाचं वाटोळं झालं, त्या बारामतीकरांकडे मोहिते पाटील यांनी कृपया जाऊ नये. भाजपने त्यांच्या गाळात गेलेल्या संस्थांना मोठी आर्थिक मदत दिली, त्यामुळे कुटुंबातील कुणालाही विजयसिंह मोहिते पाटील चुकीचा निर्णय घेऊ देणार नाहीत’, असा विश्वास शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे मोहिते पाटील नाराज आहेत, त्यामुळे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जातील, अशी चर्चा आहे. या चर्चेवर शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.