सांगोल्यातील ‘या’ उमेदवारांवर असणार वॉच! अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे खेचण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या दोन महिन्यापासून राज्यभरात प्रचाराचा धुरळा उडाला होता. सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते.

बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शनिवारी निकाल लागणार आहे. तत्पूर्वीच राज्यात सत्ता कशी स्थापन करता येणार यासाठी नेतेमंडळीची धावपळ सुरु आहे.एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात कोणत्याच पक्षाला एकहाती सत्ता मिळेल असे चित्र सध्या दिसत नसल्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील गोटात हालचालींना वेग आला आहे. महायुती व मविआच्या नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांना फोनाफोनी सुरु झाली असून अपक्षांची मदत लागणार असे चित्र आहे. त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांना फोनाफोनी सुरु झाली आहे.

यातच सोलापूर जिल्ह्यातील तीन अपक्ष निवडून येण्याची शक्यता असल्याने त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे. माढा, करमाळा आणि सांगोला मतदारसंघातील अपक्ष उमेदवारांना दोन्ही बाजूकडून निरोप येण्यास सुरुवात झाल्याचे समजते.सांगोला मतदार संघातून शेकापकडून निवडणूक लढवणारे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडे संभाव्य विजेता उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. सध्या या सर्वच अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही बाजूच्या पक्षांचे विशेष प्रयत्न आहेत. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही ठिकाणच्या नेत्यांचे फोन आल्याची माहिती यातील एका उमेदवाराने दिली.

दोन्हीकडील नेत्यांनी आपल्याचसोबत राहावे असा आग्रह धरला जात असल्याचे समजते. सांगोल्याचे शेकापचे बंडखोर उमेदवार बाबासाहेब देशमुख यांनी आपल्याला आग्रह केल्याची माहिती दिली. 23 तारखेनंतर आमचा पक्ष जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल. तर मला माझ्या विजयाची पूर्ण खात्री असल्याचेही देशमुख म्हणाले.