राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाला धक्का दिला आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत दाखल होत आहे. त्यांनी भाजपमधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. गुरुवारी शरद पवार यांची त्यांनी पुण्यात भेट घेतली होती. त्यानंतर आता धैर्यशील मोहिते यांनी भाजपा सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांना १० एप्रिल रोजी राजीनामा पत्र पाठवले होते. भाजप सोडल्यानंतर मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाणार असल्याचे वृत्त आहे.
माढा लोकसभा मतदार संघातून भाजपने रणजीत सिंह निंबाळकर यांना महायुतीचे उमदेवारी दिली. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते. मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी अकलूजमध्ये बैठक घेऊन शक्तिप्रदर्शन केले होते. त्यांनी गुरुवारी पुणे शहरात शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते भाजपमधून बाहेर पडणार असल्याचे स्पष्ट झाले. आता ते सरळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार आहेत.
उद्या शनिवारी धैर्यशील मोहिते पाटील अकलूजमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. ते माढा लोकसभा मतदार संघातून तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, मी भारतीय जनता पार्टी, सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची माझ्याकडे जबाबदारी आहे. या कार्यकाळात जिल्हा, मंडळ कार्यकारिणी, मोर्चा, प्रकोष्ठ इत्यादी संघटना रचना गठीत करुन कार्यान्वित करण्याचं कार्य केले. तसेच शक्तीकेंद्र, सुपर वॉरीयर, बूथ रचनाही सक्रिय केल्या. वेळोवेळी विविध कार्यक्रम आयोजित करुन संघटना व बूथच्या माध्यममातून जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे कार्य केले. आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास व दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो व आपणांस कळवू इच्छितो की मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा, तसेच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, त्याचा स्वीकार व्हावा ही विनंती.