अवकाळीचा फटका अजून तीन दिवस!

राज्यात एप्रिल महिन्यात अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरु आहे. या पावसामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. प्रशासन अन् शासन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत असताना शेतमालाचे नुकसान होत आहे. यामुळे नुकसानीचे पंचनामे कधी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आला. अवकाळी पावसाचे संकट अजूनही कायम असणार आहे. राज्यात 13 ते 15 एप्रिल या तीन दिवसांत अवकाळी पाऊस पडणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.13 एप्रिल रोजी मध्य भारतात हलका ते मध्यम पाऊस होणार आहे. या वेळी वादळी वारा आणि गारपीटीचा अंदाज आहे. 13 आणि 14 एप्रिल रोजी मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस होणार आहे. यामुळे राज्यात गेल्या आठवड्याच्या अखेरपासून सुरू झालेली अवकाळी पावसाचा मारा अजूनही कायम राहणार आहे.

येत्या 15 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे. राज्यातील अनेक भागांत आज रेड अन् ऑरेंज अलर्ट दिला आहे.सलग तिसऱ्या दिवशी पहाटेपासून नागपूरात अवकाळी पाऊस झाला. आज पूर्व आणि पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. आज पहाटेपासून विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु झाला आहे. मागील दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला होता.

आता त्या तुलनेत पावसाचा जोर अधिक आहे. विदर्भात एकीकडे पहिल्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीत प्रचाराला वेग आला असताना त्यावरही पावसाचा फटका बसत आहे.