डोबिंवली (Dombivli) पश्चिमेत दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या वादाच्या रागातून माजी नगरसेवक विकास म्हात्रे समर्थक आणि मेघराज तुपांगे यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला आहे. या राड्यात 3 ते 4 जण जखमी आहेत. तर, विष्णूनगर पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. विष्णूनगर पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
डोंबिवली(Dombivli) पश्चिमेतील राजुनगर खंडोबा मंदिराजवळ व्यावसायिक मिलिंद देशमुख यांचे कार्यालय आहे. या कार्यालयात विकास म्हात्रे काही कामानिमित्त शनिवारी रात्री गेले होते. याचदरम्यान, मेघराज तुपांगे देखील त्याठिकाणी आले. मेघराज तुपांगे यांचा म्हात्रे यांच्या पोलीस अंगरक्षकासोबत वाद झाला. मेघराज तुपांगे यांचा आरोप आहे की, त्याठिकाणी मला धमकी देण्यात आली. मी कार्यालयाबाहेर पडलो त्यादरम्यान विकास म्हात्रे यांच्या सांगण्यावरून माझ्यावर आणि माझा मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आले. तलवार, रॉड आणि लाकडी दांडके घेऊन दहा ते पंधरा जणांनी माझ्यासह माझ्या मित्रांवर प्राणघातक हल्ला केला. यावेळी, माझी चैनदेखील चोरण्यात आली. निवडणुकीचा राग माझ्यावर काढण्यात आला. माझी काही चुकी नसताना हा हल्ला केला आहे. त्यांच्यामुळे माझ्या जीविताला धोका आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे पोलिसांकडून मला. न्याय मिळेल अशी मला आशा असल्याचे तुपांगे यांनी काही सांगितले.
याबाबत माजी नगरसेवक विकास म्हात्रे म्हणाले की, देशमुख यांच्या कार्यालयात गेलो असता, माझ्या पोलिस अंगरक्षकाला तुपांगे यांनी शिवीगाळ केल्याचे त्याने सांगितले. तसेच, तुपाने आणि त्यांच्या कार्यकर्ते यांनी माज्या सहकारी यांच्यावर हल्ला केला.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटाच्या तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे. मेघराज तुपांगे यांच्या तक्रारीवरून ओमकार म्हात्रे, प्रमोद चव्हाण, महेश चव्हाण, अजय गोलतकर आणि अखिल निंबाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात मेघराज तुपांगे, विशाल म्हात्रे आणि शत्रुघ्न मढवी हे तिघे जखमी आहेत. तर, अजय गोलतकर यांच्या तक्रारीवरून मेघराज तुपांगे, उमेश भोईर, शत्रुघ्न मढवी, विशाल म्हात्रे, अशोक म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.