हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीला धक्का मिळाला आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेले आणि ताराराणी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी त्यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी तातडीने कोल्हापूर दौरा आयोजित करून दोन्ही मतदारसंघांचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन परिस्थिती सांगितली.हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रकाश आवाडे यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्याने महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. प्रकाश आवाडे यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली.
या बैठकीला मंत्री शंभूराजे देसाई, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील मानेदेखील उपस्थित होते. या बैठकीतून धैर्यशील माने अचानक बाहेर आले. त्यानंतर जवळपास 45 मिनिटे ही बैठक पार पडली. या बैठकीत आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल आवाडेदेखील उपस्थित होते. लोकसभेची उमेदवारी घोषित केल्यानंतर त्यांनी प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील आढावा घेतला. बैठकीच्या शेवटाला आपण 16 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. त्यानंतर आवाडे बैठकीतून बाहेर पडले.