एस. टी. महामंडळाला होणाऱ्या तोट्यातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळाकडून विविध योजना सुरू केल्या आहेत. लग्नसराईत मोठ्या प्रमाणात एस.टी.त प्रवाशांची संख्या वाढते. त्याअनुषंगाने उन्हाळ्यातील लग्नसराईसाठी सोलापूर विभागाने वऱ्हाडासाठी मागणी असल्यास शिवशाही बसदेखील देण्याची तयारी केली आहे.
यातून एस.टी.ला मोठा लाभ होणार असल्याचा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे. नुकताच यावर्षीचा लग्नसराईचा सिझन सुरू झाल्याने येत्या १६ एप्रिलपासून प्रवाशांची संख्याही वाढणार आहे. दरवर्षी लग्नसराईत मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या वाढत असल्यामुळे एस.टी. लादेखील मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. त्यामुळे सोलापूर विभागाने उन्हाळ्यात फेऱ्या वाढविण्याचे नियोजन केले आहे. येत्या चार दिवसांत नियोजन पूर्णत्वास येणार आहे.
आता उन्हाळ्यात प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एस. टी. गाड्यांचे नियोजन केले आहे. या माध्यमातून प्रवाशांना सवलत आणि विभागालाही उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे.