सांगोल्यातील कोरडा नदीला आले पाणी!

मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सोलापूर शहर व जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. करमाळा, पंढरपूर, मोहोळ, माढा, सांगोला आदी तालुक्यांमध्ये पावसाचा जोर होता. यंदाच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बहुसंख्य गावे, वाड्यावस्त्यांमध्ये पाणीटंचाईमुळे जनतेची तहान भागविण्यासाठी २०० पेक्षा अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असताना तसेच पाण्याअभावी धोक्यात आलेल्या केळी, डाळींब, पेरू आदी फळबागांसह उन्हाळी पिके वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा होती.

मान्सूनच्या आगमनाने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद उमटत होता. पण पावसामुळे अनेक दुर्घटना देखील घडल्या. एकीकडे पावसामुळे वीज कोसळून जीवित आणि वित्तहानीच्या दुर्घटना घडत असताना दुसरीकडे जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पडणा-या दमदार पावसामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे. सलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरी लागत आहे. सांगोला तालुक्यात २६.५ मिलीमीटर तर मंगळवेढा तालुक्यात २२ मिमी पाऊस पडला. सलग पडणा-या या पावसामुळे सांगोल्यातील कोरडा नदीला पाणी आले आहे. एरव्ही ही नदी कोरडीच राहते. जिल्ह्यात आठवडाभरात सर्वाधिक १२०.९ मिमी पाऊस करमाळा तालुक्यात तर १०२.९ मिमी पाऊस मोहोळ तालुक्यात झाला आहे.