मुंबईत नवं घर का घ्यावं लागलं? सईने सांगितला किस्सा

मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकरने नुकतंच मुंबईत स्वतःच घर खरेदी केलं आहे. या आधी तिने एकूण 10 घरं बदलली पण आत्ता तिने अकरावं घर स्वतःचं खरेदी केलं आहे. सईने तिच्या YouTube Channel वर “The Eleventh Place” असं Title देत तिच्या नव्या घराची झलक तिच्या चाहत्यांना दाखवली आहे.

मुंबईच्या एका आलिशान सोसायटीत सईचं हे घर आहे. तिने स्वतःच्या आवडीने या घराला सजवलं आहे. सई ताम्हनकरचं हे नवं घर सगळ्या सुख सोयींनी समृद्ध, आलिशान आणि कुणालाही आवडेल असंच आहे. पण तिने नवीन घर कसं शोधलं याबद्दल नुकताच खुलासा केला आहे. चला मग, सईची ही कहाणी जाणून घेऊयात.

सईने घर खरेदी केलं त्यासोबतच युट्यूब चॅनेलही सुरू केलं. त्यातूनच पहिली व्हिडीओ शेअर करून घराची झलक दाखवत तिने तिचा घर घेण्याचा प्रवास आणि मुंबई याबद्दल सांगितलं आहे.

व्हिडीओमधून सईने काय सांगितलं?

‘मी तुम्हाला खरं सांगू तर, घर घेण्याचा माझा कोणताही प्लान नव्हता. मला लॉकडाऊनमध्ये एक दिवस खूप कंटाळा आला त्यामुळे मग मी कंटाळा घालवण्यासाठी चला आपण घर शोधूया, असं ठरवून बाहेर पडले. कारण, मी जर आता घर शोधण्याची सुरुवात केली तर मला 6 महिने किंवा वर्षभराने घर सापडेल. मी जे घर घेतलंय ते माझं तिसरं घर आहे.

हे घर पाहिल्यानंतर मी त्या घराची स्वप्न पाहू लागले आणि मग मी हे घर बुक केलं. आता मला त्याचा फार अभिमान वाटतोय. मुंबईत घर घेणं ही फार मोठी गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की जर मी हे करु शकते तर कुणीही ते करु शकतं. यासाठी तुम्ही फक्त मनाशी पक्का निश्चय करायला हवा.’, असं सई ताम्हणकर व्हिडीओमध्ये म्हणाली.

सई ताम्हणकर झाली मुंबईकर!

मुंबईत घर खरेदी केल्यानंतर सई आता खऱ्या अर्थाने मुंबईकर झाली आहे. ती मूळची सांगलीची आहे. 2005 मध्ये ती सांगलीहून मुंबईला आली. या प्रवासात तिने एकूण 10 घरं बदलली आणि आता अकरावे स्वत:चे घर खरेदी केले.