बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांना पॉवर कपल मानलं जायचं. नव्वदच्या दशकात हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर दोघांनी लग्न केलं. तब्बल 19 वर्षांच्या संसारानंतर ही जोडी विभक्त झाली. मलायका आणि अरबाज यांना अरहान हा 21 वर्षांचा मुलगा आहे. आता अरबाज त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. नुकताच त्याने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी निकाह केला. त्यामुळे पुन्हा एकदा अरबाज आणि मलायकाच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
मलायका आणि अरबाज हे बॉलिवूड इंडस्ट्रीत चर्चेत राहणारी जोडी होती. त्यामुळे या दोघांचा घटस्फोटसुद्धा तितकाच चर्चेत होता. हे दोघं का विभक्त होत आहेत, घटस्फोटानंतर मलायकाने अरबाजकडे किती पोटगी मागितली, असे प्रश्न अनेकांना पडले होते. 2016 मध्ये दोघांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता आणि त्यानंतर 2017 मध्ये अखेर दोघं अधिकृतरित्या विभक्त झाले.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायकाचा खटला लढणारी वकील वंदना शाहने एका न्यूज पोर्टलशी बोलताना फक्त इतकंच सांगितलं होतं की पोटगीचा विषय अत्यंत गोपनीय आहे. त्यामुळे सार्वजनिकरित्या मी त्याविषयी काही बोलू शकणार नाही. पण काही रिपोर्ट्सनुसार, मलायकाने अरबाजकडे 10 कोटी रुपयांची मागणी केली होती. अरबाजने तिला 15 कोटी रुपये पोटगी म्हणून दिली होती.
एकीकडे अरबाजने दुसऱ्यांदा निकाह केला आहे. तर दुसरीकडे मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करतेय. सोशल मीडिया असो, एखादा कार्यक्रम असो, बॉलिवूड पार्ट्या असो किंवा मग डिनर डेट.. अर्जुन आणि मलायका खुलेपणाने एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसतात. सध्या बॉलिवूडमधल्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी ही एक जोडी आहे. या दोघांच्या वयात 12 वर्षांचं अंतर असल्याने अनेकदा त्यांना ट्रोल करण्यात आलं. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता दोघांनी जाहीरपणे एकमेकांविषयी प्रेम व्यक्त केलं.
एका मुलाखतीत मलायका तिच्या लग्नाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली होती. “मी लग्नाबद्दल नक्कीच विचार केला आहे. लोकांना असं वाटत असेल की मी पुन्हा लग्न करण्याबाबत नकारात्मक असेन, पण हे खरं नाहीये. मला लग्नसंस्थेवर पूर्ण विश्वास आहे. तितकाच मला प्रेमावरही विश्वास आहे. मी पुन्हा लग्न कधी करेन हे मी सांगू शकत नाही, कारण एखाद्याच्या आयुष्यातील काही गोष्टी सरप्राइज म्हणून राहिलेल्याच बऱ्या असतात. मला सतत प्लॅनिंग करायलाही आवडत नाही”, असं ती म्हणाली होती.