हमास आणि इस्रायल यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा आजचा बारावा दिवस आहे. या युद्धात आत्तापर्यंत शेकडो लोकांचा बळी गेला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला केला. या हल्ल्यात १ हजाराहून अधिक इस्रायलींचा मृत्यू झाला आहे. हमासचे दहशतवादी हे हल्ला करताना क्रौर्याचा कळस गाठत आहेत. या दहशतवाद्यांनी निरपराध इस्रायलींच्या घरात घुसून त्यांची हत्या केली. हमासचे दहशतवादी घरात शिरल्यानंतर नागरिक सुरक्षित आश्रय स्थळाच्या दिशेने धावले किंवा घरात अडकले आणि मारले गेले अशी स्थिती आहे. अशात हमासच्या हल्ल्यातून एक भारतीय महिला बचावली आहे. सबिता असं तिचं नाव आहे ती मूळची केरळची आहे. Twitter वर पोस्ट करत तिने तिचा अनुभव सांगितला आहे.
सबिताने Twitter वर तिचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात तिने हमासच्या दहशतवाद्यांचा धक्कादायक अनुभव सांगितला. हमासचे दहशतवादी आले, तेव्हा मी त्यांना दरवाजातच रोखून धरलं. त्यांना अशा प्रकारे रोखलं की दरवाजा त्यांना उघडता आला नाही. जर हमासचे दहशतवादी आतमधे घुसले असते तर इस्रायली नागरिकांना त्यांनी ठार केलं असतं. मागच्या तीन वर्षांपासून मी इस्रायलच्या सीमा भागात काम करते आहे. इथल्या एका भागात मी केअर गिव्हर म्हणून काम करते. एका वृद्ध महिलेच्या देखभालीची जबाबदारी माझ्यावर आहे. माझी नाईट शिफ्ट होती, ती संपवून मी सकाळी ६.३० ला निघणार होते. त्यावेळी सायरनचा आवाज ऐकला आणि सेफ्टी रुमच्या दिशेने धावत गेलो. @IsraelinIndia या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
मला त्या महिलेच्या मुलीने सांगितलं की हमासचे दहशतवादी आले आहेत. पुढचा आणि मागचा दरवाजा बंद करायला सांगितला. काही क्षणातच दहशतवादी आमच्या घरात शिरले. त्यांचा आवाज ऐकू आला. त्यांच्या गोळीबारात काही ग्लास फुटले. मात्र मी आणि माझ्या मैत्रिणीने या दहशतवाद्यांना सुमारे अर्धा तास दरवाजातच रोखून धरलं होतं. मात्र त्यांनी दरवाजावरही गोळ्या चालवल्या, असं सबिताने सांगितलं आहे. काही वेळाने इस्रायली लष्कर आमच्या मदतीला आलं असंही सबिताने सांगितलं. सबिताने हा थरारक अनुभव सांगितल्यानंतर नेटकऱ्यांकडून तिचं कौतुक केलं जातं आहे. तसंच तिला रणरागिणीचीही उपमा देण्यात आली आहे.