कोल्हापूर, हातकणंगलेतून शरद पवार हुकमी एक्के काढणार बाहेर; शेट्टींच्या अडचणी वाढणार

‘लोकसभेचे कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघ राष्ट्रवादीचे पारंपरिक आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार द्या,’ अशी मागणी काल (बुधवार) शरद पवार गटाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील बैठकीत केली.

कोल्हापुरातून व्ही. बी. पाटील, तर हातकणंगलेतून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशीही मागणी झाली. माजी खासदार राजू शेट्टी यांना मात्र जागा सोडू येऊ नये, अशी जोरकस सूचनाही करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, एकनाथ खडसे, आमदार बाळासाहेब पाटील, कोषाध्यक्ष हेमंत टकले, राष्ट्रीय चिटणीस नसीम सिद्दीकी उपस्थित होते.

वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून संघटन वाढवण्याच्या तसेच निष्ठावंतांना घेऊन प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस रुजवण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघातून आढाव्याची सुरुवात करण्यात आली. तब्बल अडीच तास चाललेल्या आढाव्यात जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्यासह तालुकाध्यक्ष, महिला अध्यक्ष, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील राजकारणाची स्थिती जाणून घेतली.

यावेळी आघाडीमध्ये तीन पक्ष असले तरी राष्ट्रवादीचे हे दोन्ही मतदारसंघ पारंपरिक आहेत. वातावरण चांगले असून, दोन्ही जागा मागा, आपले उमेदवार नक्कीच निवडून येतील, उमेदवार नाहीत, असे अजिबात नाही. जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या नावाला एकमताने पसंती दर्शवली. बैठकीस आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार राजीव आवळे, नितीन जांभळे, मदन कारंडे, पद्मा तिवले, सुनील देसाई, अनिल घाटगे, अश्‍विनी माने, रोहित पाटील, नितीन पाटील, अमर चव्हाण, श्रीकांत पाटील, प्रकाश पाटील, शिवानंद माळी, शिवाजी सावंत, मुकुंद देसाई, विक्रमसिंह जगदाळे आदी उपस्थित होते.