कलयुगातला श्रावण बाळ म्हणून सध्या सर्वत्र डी. कृष्णकुमार हे नाव गाजत आहे. कर्नाटक राज्यातील मैसूर मध्ये राहणारे डी.कृष्णकुमार हे 73 वर्षीय आई चुडारत्नमा यांना स्कूटर वरून भारतातील विविध धार्मिक स्थळांची यात्रा करत आहेत. हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे दोघे माय- लेक सध्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी कोल्हापुरात दाखल झालेले आहेत.
बेंगळुरूमधील एका आयटी कंपनीमध्ये डी कृष्णकुमार यांनी कॉर्पोरेट टीम लीडर म्हणून काम पाहिले आहे. वडिलांच्या निधनानंतर आईची सेवा करण्याच्या उद्देशाने त्यांनी नोकरी सोडली आणि मातृसेवेचा निर्धार करत मातृसेवा संकल्प यात्रेला’ सुरुवात केली.
डी कृष्णकुमार यांना त्यांच्या वडिलांनी 22 वर्षांपूर्वी स्कूटर भेट म्हणून दिली. वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलांनी दिलेली भेट अर्थात स्कूटर त्यांनी जीवापाड सांभाळलेली आहे. याच स्कूटरवरून त्यांनी आपल्या आईला घेऊन वृद्धापकाळात देशभरातील विविध धार्मिक स्थळांना भेटी सुरू केलेले आहेत.
6 जानेवारी 2018 रोजी मैसूर होऊन त्यांची मातृसेवा संकल्प यात्रेला सुरुवात झाली होती. मात्र जगभर Covid चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे त्यांना ही यात्रा तात्पुरती स्थगित करावी लागली होती. त्यानंतर आता 15 ऑगस्ट 2022 पासून त्यांनी या यात्रेला पुन्हा सुरुवात केली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून त्यांची ही भ्रमंती सुरू असून त्यांनी आत्तापर्यंत 78 हजार किलोमीटरचा टप्पा पार केलेला आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते आपल्या आईंना घेऊन करवीर निवासिनी श्री. अंबाबाईच्या दर्शनाला कोल्हापूरमध्ये पोहोचले.
मैसूरपासून सुरू झालेल्या या यात्रेत त्यांनी भारतासह नेपाळ, म्यानमार आणि भूटानची सफर ही या स्कूटरवरून आईला घडवलेली आहे. या निमित्ताने त्यांनी यात्रेमध्ये अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिलेले आहेत.
जबाबदारीच्या ओझ्याखाली घराचा उंबरा ही ओलांडून न शकलेल्या आईला संपूर्ण भारत आणि जगातील धार्मिक स्थळ स्कूटर वरून दाखवण्याचा संकल्प करणाऱ्या या आधुनिक श्रावणबाळाचे आणि त्यांच्या आईचं सर्वत्र कौतुक होत आहे.