वीज बिलाची फोडणी! मे महिन्यापासून वाढीव वीज बिल

राज्यात उन्हाचा पारा चांगलाच तापला आहे. अनेक ठिकाणी तापमानाने ४० अंश सेल्सियस गाठले आहे. यामुळे घराघरात एसी आणि कुलरचा वापर होत आहे. एप्रिल महिन्यानंतर मे महिन्यात ऊन जास्त असते. या उन्हाळ्यात वीज बिलाचा झटका मुंबईतील ग्राहकांना बसणार आहे. मुंबईकरांना उन्हाचा तडाखा बसत असतानाच आता मे महिन्यापासून वीज दरवाढीच्या झळाही सहन कराव्या लागणार आहेत. अदानी वीज कंपनीची वीज महागली आहे. वीज दरवाढीचा फटका सुमारे ३० लाख वीज ग्राहकांना बसणार आहे.

मे महिन्याच्या बिलापासून निवासी ग्राहकांच्या इंधन अधिभारात प्रति युनिट ७० पैसे ते १.७० रुपये इतकी मोठी वाढ होणार आहे.

  • ०-१००युनिट वीज वापर असणाऱ्या निवासी ग्राहकांकडून प्रति युनिट ७० पैसे
  • १०१-३०० युनिटसाठी १.१० रुपये
  • ३०१-५०० युनिटसाठी १.५ रुपये
  • ५०० हून अधिक वीज वापरासाठी १.७० रुपये इंधन अधिभार आकारण्यात येणार आहे.

गेल्यावर्षी इंधन खर्चात वाढ झाली आहे. या इंधन दरवाढीपोटी वीज कंपन्यांचे नुकसान होत आहे. यामुळे अदानी कंपनीने ३१८ कोटी ३८ लाख रुपये वसूल करण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगापुढे प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव आयोगाने मंजूर केला. यामुळे इंधन अधिभाराची ही रक्कम इंधन अधिभारातून मे ते ऑगस्ट २४ या काळात ग्राहकांकडून वसूल केली जाणार आहे. तसेच वाणिज्य, औद्योगिकसह अन्य ग्राहकांसाठीही वीज वापरानुसार इंधन अधिभार आकारला जाणार आहे.