बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश!

बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा  मुंबई पोलिसाकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या टोळीमध्ये एका डाॅक्टरचा देखील समावेश आहे. फर्टिलिटी केंद्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या टोळीने आत्तापर्यंत 14 बालकांची विक्री केल्याचं तपासात उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

पोलिसांनी बालकांची विक्री करणाऱ्या महिला दलालासह एकूण 7 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच तीन जणांना सखोल चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वंदना अमित पवार, शितल गणेश वारे, स्नेहा सूर्यवंशी, नसीमा खान, लता सुरवाडे, शरद देवर आणि डॉ. संजय सोपानराव खंदारे यांचा समावेश आहे. 

सर्व आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींनी या गँगच्या माध्यमातून विक्री केलेल्या लहान बाळांमध्ये 11 मुले आहेत, तर तीन मुली आहेत. कमीत कमी पाच दिवस ते जास्तीत जास्त 9 महिने असं विक्री केलेल्या बाळांचे वय आहे. पोलिस उपायुक्त रागासुधा आर. यांनी दिलेल्या माहितीनुसार एका बीएचएमएस डॉक्टरला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फर्टिलिटी फर्टिलिटी केंद्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लहान बाळांची विक्री करणाऱ्या टोळीतील 7 लोकांना अटक करण्यात आली आहे.