सोलापूरात आज उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा!

सध्या उन्हाची तीव्रता खूपच वाढलेली पहायला मिळत आहे. उन्हामुळे अनेकांना उष्माघाताचा धोका वाढत आहे. मंगळवार 30 एप्रिल रोजी या मोसमातील सर्वाधिक तापमानाची (44 अंश सेल्सिअश) नोंद झाली. त्यानंतर दोन दिवस तापमानात किंचित घट झाली. मात्र, आता पुन्हा उष्णतेच्या लाटेचा उशारा देण्यात आला आहे. 3 व 4 मे रोजी ही लाट राहणार असून 6 मे पर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सोलापूरचे तापमान हे पुढील काही दिवस चढेच राहणार आहे.

हे तापमान सरासरी तापमानापेक्षा १ ते २ अंशाने वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना या तापमानाचा आणखी त्रास सहन करावा लागणार आहे. मार्च महिना सुरु झाल्यापासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिले. 30 एप्रिल रोजी तर तापमान सर्वाधिक राहिले. दरवर्षी मे महिन्यात तापमान जास्त असते. त्यामुळे यंदाही असाच अंदाज वर्तविण्यात येत आहे.

या वाढत्या उष्णतेमुळे लोकांच्या आरोग्यावर अनेक परिणाम दिसून येत आहे. लोकांना चक्कर येणे उलटी मळमळ या सरखे आजार जडले आहे. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे तसेच भर उन्हात बाहेर न जाण्याचे आवाहन आरोग्य विभागाने नागरिकांना केले आहे.सोलापूरचे तापमान हे 29 एप्रिल रोजी 42.9, 30 एप्रिल रोजी 44, 1 मे रोजी 42.6, 2 मे रोजी 42.8 अंश सेल्सिअस इतके तापमान होते. 1 मे रोजी तापमानात घट झाली असली तरी लगेच दुसऱ्या दिवशी 0.2 अंश सेल्सिअसने यात वाढ झाली. पुढील काहीदिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.