सध्या महाराष्ट्रात उकाडा प्रचंड वाढला आहे. याच दरम्यान मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात. त्यामुळे, या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कुटुंबासोबत फिरायला जाण्याचे प्लॅन्स बनवले जातात. या कडक उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जाण्याला प्राधान्य दिले जाते. देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांमध्ये महाराष्ट्राचा सर्वात वरचा क्रमांक आहे. महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक किल्ले, लेण्या, थंड हवेची ठिकाणे, अजिंठा-वेरूळसारखी प्रसिद्ध लेणी, मंदिरे, प्रेक्षणीय स्थळे इत्यादी बरंच काही आहे. त्यामुळे, देश-विदेशातील पर्यटकांची महाराष्ट्रात पर्यटन करण्याला पसंती असते.
जर तुम्ही देखील फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. कोणती आहेत ही ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात.
खंडाळा आणि लोणावळा
महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांमध्ये लोणावळा आणि खंडाळ्याचा प्रामुख्याने समावेश केला जातो. उन्हाळा असो की हिवाळा, पर्यटकांची नेहमीच या ठिकाणी गर्दी पहायला मिळते. थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या या हिल स्टेशनला भेट दिल्यावर तुम्हाला अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहता येतील. ज्यामध्ये कार्ले-भाजे लेणी, लोहगड आणि विसापूर किल्ला, तलाव, धबधबे, सनसेट, सनराईझ पॉईंट, इको पॉईंट, टायगर पॉईंट इत्यादी ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता.
भंडारदरा
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणून भंडारदऱ्याची खास ओळख आहे. अहमदनगर जिल्ह्यात स्थित असलेले हे ठिकाण ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. भंडारदरा हे ठिकाण तेथील विल्सन डॅम आणि आर्थर लेकसाठी खास करून ओळखले जाते.येथील सुंदर दृश्य पाहिल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पुन्हा याल. भंडारदऱ्याला गेल्यावर तुम्ही कळसूबाई शिखर, रतनगढ किल्ला इत्यादी पर्यटन स्थळांना ही भेट देऊ शकता.
इगतपुरी
नाशिक जिल्ह्यात स्थित असलेले हे ठिकाण पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या इगतपुरीमध्ये पाहण्यासारखे भरपूर काही आहे. नाशिकपासून हे ठिकाण ४६ किलोमीटर अंतरावर असून महाराष्ट्रातील एक सुंदर पर्यटनस्थळ म्हणून इगतपुरी ओळखले जाते.
येथील घनदाट जंगले, पश्चिम घाट, ऐतिहासिक किल्ले आणि मनमोहक निसर्गाने हे ठिकाण वेढलेले आहे. त्यामुळेच, या ठिकाणी निसर्गप्रेमींची नेहमीच गर्दी पहायला मिळते. येथे आल्यावर तुम्ही कळसूबाई शिखर, भातसा नदी, विपश्यना केंद्र, खोल दऱ्या आणि मनमोहक निसर्ग पाहू शकता.