आयपीएलच्या 17 व्या मोसमात 59 सामन्यानंतरही प्लेऑफचं एकाही टीमला तिकीट मिळवता आलेलं नाही. स्पर्धेतून पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स बाहेर पडल्याने आता 8 संघांमध्ये प्लेऑफच्या 4 जागांसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. गुजरात टायटन्सने शुक्रवारी 10 मे रोजी चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करत स्वत:सह लखनऊ, आरसीबी आणि दिल्लीचंही आव्हान कायम राखलं. प्लेऑफसाठी रस्सीखेच सुरु असताना बीसीसीआयने दिल्ली कॅपिट्ल्सचा कॅप्टन ऋषभ पंतवर सर्वात मोठी कारवाई केली आहे. बीसीसीआयने पंतवर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच पंतला एका सामन्यात खेळताही येणार नाही. त्यामुळे ऐन क्षणी पंतच्या अनुपस्थितीत दिल्लीला खेळावं लागणार आहे.
पंतकडून आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन झालं. त्यामुळे पंतवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पंतला आरसीबी विरुद्ध 12 मे रोजी होणाऱ्या सामन्यात खेळता येणार नाही.आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 56 व्या सामन्यात 7 मे रोजी दिल्लीने राजस्थानवर विजय मिळवला. दिल्लीला या सामन्यात ओव्हर रेट कायम राखता आला नाही. पंत ठराविक वेळेत ओव्हर पूर्ण करु शकला नाही. त्यामुळे बीसीसीआयने ही कारवाई केली आहे.