लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्याशी निगडित असलेल्या सोलापूर, माढा व धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान झाले आहे. देशातील लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे.सोलापुरात माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे.या मतमोजणीसाठी जवळपास ६७२ कर्मचारी आवश्यक आहेत.
मतमोजणीच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी १४ टेबल असणार आहेत.एका टेबलसाठी तीन कर्मचाऱ्यांससह एक शिपाई असे एकूण चार कर्मचारी आवश्यक आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, सोलापू्र शहर मध्य, सोलापू्र शहर उत्तर, मोहोळ आणि पंढरपूर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.
माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस व सांगोला विधानसभा मतदारसंघ आणि सातारा जिल्ह्यातील माण व फलटण हे दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात. एका विधानसभा मतदारसंघासाठी ५६ कर्मचारी या प्रमाणे १२ विधानसभा मतदारसंघासाठी ६७२ कर्मचारी आवश्यक आहेत.
मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना मे अखेरपर्यंत मतमोजणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यापूर्वी मतदानाचे प्रशिक्षण व्यवस्थितरीत्या दिल्याने लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी फारशा तक्रारी आल्या नव्हत्या. आलेल्या तक्रारींचा निपटारा तत्काळ करण्यात आला होता.
माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्र सध्या सोलापुरातील रामवाडी येथील शासकीय धान्य गोदामात आहेत. या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.