चारा छावणी सुरू करण्याची मागणी…

सोलापूर जिल्ह्याचा बहुतांश भाग हा शेतीच्या पाण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणावर अवलंबून आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये पाऊस कमी झाल्याने उजनी धरणामध्ये पाणीसाठा कमी झाला. भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यात चारा छावणी सुरू करण्याची मागणी हराळवाडी (ता. मोहोळ) येथील सामाजिक कार्यकर्ते माउली हेगडे यांनी राज्यपाल आणि मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे.राज्यांमध्ये गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे बहुतांश भागात भीषण पाणीटंचाई आणि चाऱ्याची कमतरता आहे. लोकांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. जनावरांसाठी देखील चारा उपलब्ध होत नाही. दुष्काळी उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्ह्यात चारा डेपो किंवा चारा छावण्या सुरू करण्याची मागणी हेगडे यांनी केली आहे.