सांगली आणि मिरज रेल्वेस्थानक बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍याविरुद्ध गुन्हा नोंद !

सांगली आणि मिरज रेल्वेस्थानक बाँबने उडवून देण्याची धमकी देणारा संशयित आरोपी रियाज कसाब याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपी रियाज याने दूरभाष केल्यानंतर पोलिसांनी सांगली आणि मिरज रेल्वे स्थानकांची संपूर्ण पडताळणी केली; मात्र बाँबसदृश्य कोणतीही वस्तू आढळून आली नाही.रेल्वे प्रवासी आणि पोलीस प्रशासन यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता.

पोलिसांनी सांगितले की, १३ मे या रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सांगली शहर पोलीस ठाण्यात एक दूरभाष आला. या दूरभाषवर बोलणार्‍या व्यक्तीने रियाज कसाब बोलत असल्याचे सांगितले. पाकिस्तानातील लाहोर येथून आपण सांगली येथे आलो असून आपण आतंकवादी आहोत. आपल्यासमवेत अन्य ५ व्यक्ती आहेत. जवळ असलेल्या ‘आर्.डी.एक्स.’ने रेल्वेस्थानक उडवण्याची धमकी त्याने दिली. त्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी रेल्वे स्थानकावर शोधमोहीम राबवली.

रेल्वेस्थानक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुसरीकडे पोलिसांची ‘आर्.डी.एक्स’ची शोधमोहीम चालू केली. या परिसरात रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्त होता. पोलिसांना दोन्ही रेल्वेस्थानकांवर काहीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही. त्यामुळे कुणीतरी खोडसाळपणा करण्याच्या उद्देशाने हा दूरभाष केल्याचे निष्पन्न झाले.