मान्सूनच्या आगमानसासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असतानाच हा अखेरचा टप्पा अनेकांसाठीच अडचणींचा ठरत आहे. कारण, बहुतांश भागांमध्ये उकाडा वाढतच चालल्यामुळं हा दाह अनेकांना सोसेनासा झाला आहे. एकिकडे उकाडा अडचणी वाढवत असतानाच दुसरीकडे राज्यात मान्सूनपूर्व पावसानंही धुमाकूळ घातला आहे. वादळी वाऱ्यांसह येणाऱ्या या पावसामुळंही नागरिकांची तारांबळ उडताना दिसत आहे. तर, शेत आणि फळबागांचंही नुकसान होत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी असेल असं सांगत इथं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात येत्या काळात तापमानातीच चढ-उतारही पाहायला मिळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, यावेळी ताशी 30-40 किमी इतक्या वेगानं वारे वाहणार आहेत. परिणामी या भागांमध्ये हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तिथे मराठवाड्यातही सोसाट्याचा वारा थैमान घालण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे.
स्कायमेटच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये तेलंगमा, कर्नाटकचा किनारपट्टी भाग, तामिळनाडूचा अंतर्गत भाग आणि लक्षद्वीपच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पाऊसधारा बरसणार आहेत. तर, पूर्वोत्तर भारतामध्येही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. गुजरात, राजस्थान आणि पंजाबमध्ये मात्र हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे.