पवई हिरानंदानी भागात अजूनही राडा सुरूच आहे. पवई हिरानंदानी भागात दोन तासांपासून मतदान खोळंबलं होतं. बंद पडलेलं मतदान यंत्र बदलूनही मतदान खोळंबलेलंच आहे. त्यातच शिंदे गटाचे नेते दिलीप लांडे यांना आत सोडल्याने गोंधल अजून वाढला. ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. मतदान बंद असतानाच लांडेंना आत सोडलंच कसं असा सवाल विचारण्यात येतोय.
पवईत ईव्हीएम मशीन बंद असल्याची तक्रार अभिनेता आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकरांनी दुपारी 12 च्या सुमारास केली आहे. त्यानंतर जवळपास तासाभरानं इव्हीएम रिप्लेस केल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली. मात्र त्यानंतर एक तास उलटून गेलाय पण अजूनही त्यांचं मतदान झालं नाही. अभिनेता आदेश बांदेकर, त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर, अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासह 100 च्या आसपास लोक मतदानासाठी ताटकळले आहेत .
आदेश बांदेकर म्हणाले, सर्वांना समान न्याय हवा. कोण सेलिब्रिटी, कोण मतदार असे काही नसते. मतदारांना चार – चार रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यापेक्षा गतीमान मतदानाची व्यवस्था केली असते तर चांगले झाले असते. लोकांचा उद्रेक आहे हे सर्वांना माहीत आहे.मतदानाचे वेळीच नियोजन होणे गरजेचे होते. काही मतदान केंद्रात खूप गर्दी आहे तर काही मतदान केंद्र रिकामे पडले होते. हा प्रकार पाहून हा रणनीतीचा भाग होता की काय? असा सवाल मनात शंका येत आहे.