यात्रा-जत्रांतील नृत्यांवर बंदी घाला…

ग्रामीण भागात जत्रा, उरूस, यात्रेनिमित्त ट्रॅक्टर ट्रॉलीवर परप्रांतीय महिलांची नृत्ये सादर करण्याचा नवा प्रकार सर्वत्र सुरू आहे. अशा कार्यक्रमांतून अत्यंत हिडीस नृत्य, अश्‍लील हावभाव केले जात असल्याचे स्पष्ट दिसून येते. अशा कार्यक्रमांवर तातडीने बंदी घालावी अन्यथा अशा ठिकाणी जाऊन युवासेनेच्या स्टाईलने कार्यक्रम बंद पाडू, अशा आशयाचे निवेदन शुक्रवारी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गावची परंपरा, धार्मिक महत्त्व बाजूला पडून महिलांच्या नृत्यांवर मोठा खर्च केला जातो. गावातील गटांकडून असे वेगवेगळे ग्रुप बोलावून इर्षा केली जाते. यामुळे गावात हुल्लडबाजीचे प्रकार वाढले आहेत. संबंधित मुली ट्रॉलीवरून प्रेक्षकांच्या दिशेने पाहून अश्‍लील हावभाव करत असतात. अशा कार्यक्रमांमुळे प्रामाणिकपणे कला जपणारे नृत्यकलाकार बेरोजगार झाले आहेत. याबाबत उरूस, जत्रेत असे ग्रुप बोलाविणाऱ्या मंडळांवर, आयोजकांवर कारवाई करण्यात यावी. गणेश उत्सव व लोकोत्सवांमध्ये असे प्रकार घडू नयेत यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अन्यथा युवासेना स्टाईलने ते बंद करू.