जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील जिल्ह्यातील २१९ शाखांत अशाप्रकारे अपहार झाला आहे का? याबाबतची तपासणी करण्यासाठी सहा पथके तयार केली आहेत. अधिकारी आणि कर्मचारी अशा ४८ जणांकडून काल, गुरुवारपासून जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये चौकशी सुरू केली आहे.या तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून विविध प्रकारचे अनुदान, विमा रक्कम देण्यात येते. ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात पाठवली जाते. यातील अनेक खात्यांवरील रक्कम काढली जात नाही. अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपयांची रक्कम तशीच पडून आहे. या रकमेचा अपहार करून ती काढण्यात आल्याचा प्रकार तासगाव मार्केट यार्ड शाखेत पुढे आला. त्याशिवाय त्यानंतर निमणी सिद्धेवाडी येथेही असे प्रकार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संचालक मंडळाची तातडीची बैठक घेण्यात आली.
तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय अशा पद्धतीने अपहार इतरत्र झाला आहे का याची तपासणी करण्यासाठी ४८ अधिकारी, कर्मचारी यांची सहा पथके तयार करण्यात आली. ही पथके गुरुवारपासून चार दिवस विविध शाखांत भेटी देऊन तपासणी करणार आहेत. तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. गुरुवारी सार्वजनिक सुट्टीचा दिवस असूनही जिल्हा बँकेचे अधिकारी कर्मचारी हे कामावर हजर होते. त्यांनी अनुदान आलेल्या खात्याची तपासणी सुरू केली आहे. पुढील चार दिवस ही तपासणी सुरू राहणार आहे.